. किल्याचे ठिकाण : किल्ले वारुगड सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण या तालुक्यातील वारुगड माची गावाच्या जवळ आहे. माण व फलटण या तालुक्याची विभागणी करत सह्याद्रीची महादेव डोंगररांग पुढे जाते. या पूर्व - पश्चिम असणाऱ्या डोंगररांगेत किल्ले वारुगड आभाळशी स्पर्धा करत उभा आहे. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात येतो. किल्ले वारुगड च्या परिसरात वारुगड माची , दहिवडी , गिरवी ही गावे आहेत.



वारुगड ला जाण्यासाठी २-३ मार्ग आहेत. त्यापैकी सोयीस्कर मार्ग म्हणजे फलटण- गिरवी- चव्हाणवाडी- वारुगड ..! वारुगड किल्ला हा दोन भागामध्ये विभागला जातो. एक गडाची माची तर दुसरा गडाचा बालेकिल्ला. *माची :* किल्याच्या माचीवर गेल्यास किल्याच्या घेरा लक्षात येतो. या माचीचे खास वैशिष्ट्य म्हणजे किल्याच्या माचीस पूर्णपणे तटबंदी आहे. आनंदाची बाब म्हणजे आज ही माचीवरील तटबंदी बऱ्यापैकी व्यवस्थित आहे. या माचीवरुन पुढे जाताना दोन वाटा लागतात. एक वाट सरळ बालेकिल्ल्यावर जाते तर दुसरी वाट मोंगळ - घोडेवाडी या गावाकडे जाते. माचीवर घरांचे वाड्यांचे अवशेष पडलेले आहेत. पाणीटाके , तळे या सोबत भैरोबाचे मंदिर आहे. मुक्कामासाठी या मंदिरात किल्यावर राहण्याची सोय होऊ शकते. *बालेकिल्ला :* किल्याचा दुसरा भाग म्हणजे बालेकिल्ला. बालेकिल्ल्यावर एक इमारत पाहायला मिळते. बलेकिल्यावरुन समोर नजर खिळते तेव्हा हा किल्ला महत्वाच्या जागेवर उभारला याची जाणीव होते. बालेकिल्यावरून सिताबाईचा डोंगर , महादेव डोंगररांग परिसर दिसतो. संगोषगड व वारूगडास जोडणारी एक पाऊलवाट सिताबाईच्या डोंगररांगेतून येते. *इतिहास / महत्व :* शिवरायांनी आग्र्याला जाण्याअगोदर किल्ले वारुगड , संतोषगड चा परिसर स्वराज्यात आणला होता. या किल्याच्या तटबंदी व डागडुजी महाराजांनी केल्याचे सांगितले जाते. या किल्याचा किल्लेदार कोण होता , या किल्यासाठी युद्ध झाले का याविषयीचा इतिहास हरवला आहे. मात्र प्रभू जातीचा कोणीतरी किल्लेदार व त्यांच्यासोबती २०० पहारेकरी व बरीचशी शिबंदी होती याचा उल्लेख येतो. दुसऱ्या बाजीवरकडून फडणीस विठ्ठलपंत यांनी किल्ला ताब्यात घेतल्याचा समजते. *✒ दुर्गवेडा सुनिल साखरे