छत्रपती शंभुराजे परिवार
सातारा विभाग
आयोजित
किल्ले वैराटगड मोहीम
धीरज , ओमकार , ऋषि , कृष्णा तसेच त्यांचे मित्र संध्याकाळी एकत्रित आले होते. निमित्त होते वैराटगडावर मोहीम घेण्याचे. वैराटगडावरील पाण्याचे टाके स्वच्छ करायच होत. सर्वांनी सोबत काही साहित्य घेतलेले. पाण्याच्या टाक्यात खराब पाणी होते. म्हणून ते पाणी उपसण्यासाठी एका जनरेटर पंपाची गरज होती. तो पंप याला त्याला विनवण्या करून कसबसा मिळवला होता. सर्व किल्याच्या पायथ्याला जमली थोडस जेवण केलं आणि रात्री १२ च्या वेळी किल्ला चढण्यासाठी निघाले. रात्रीच्या वेळी निघण्याचे कारण म्हणजे किल्ला चढायला अवघड आहे, त्यात २०-२५ किलो वजनाचे जनरेटर आणि पाईप घेऊन वर जायचं होतं. रात्रीच्या वेळी निघाल्यास दुसऱ्या दिवशी कामासाठी जास्त वेळ मिळेल त्यामुळं रात्रीच किल्ला चढण्याचे नियोजन केले होते.
एक तास झाला होता , जनरेटर पंपाचे वजन खूप होत त्यामुळं आळी-पाळी ने जनरेटर घेऊन पोर निघाली होती. एक -दिड तास झाला होता. किल्याच्या निम्या रस्त्यात पोर पोहचली होती. तेवढ्यात पोरांच्या कानावर आवाज आला..
"कोण हाय र तिकडं , इतक्या रातीच कुठं निघाली गडावर.. आणि काय तुमचा मनसुबा हाय..?
तस किल्ला चढणारी पोर जरा घाबरलीच , कुठून आवाज येतोय त्यांना कळेना झालं..आवाज तसा रांगडा होता त्यामुळ तर ही पोर दचकली आणि जाग्यावरच उभारली.
तसा परत आवाज आला.
अरर्रर्रर्र तुम्हाला इचारलेल कळत न्हाय का ? की मुकी हाइत तुम्ही ?
पोरांना काय घडतय ते कळत नव्हतं. तेवढ्यात बलदंड बाहू असलेला , पांढरा अंगरखा घातलेला , उंच देह , हातात तलवार , झडप मिशी असलेला देह समोर आला.
तस पोरांची बोलती बंदच झाली.
चेहऱ्यावर राग , डोळ्यात अंगार दिसत होता. चेहऱ्यावर वार झालेला वण दिसत होता.
तस परत तो माणूस पोरांना ओरडला.
माघारी निघा , चालते व्हा गडाखाली....इतक्या रातीच किल्यावर काय काम तुमचं ?
तस पोर घाबरत घाबरत बोलली जी आम्ही दुर्गसेवक हाय.
तुम्ही हातात ही टिकाव , खोरी घेऊन कुठं निघालात.?
तोरणा गडावर खजिना शोधण्यासाठी तटबंदी फोडली तस इथं पण खजिना शोधायला निघालात का र ?
तस त्या पोरांमधील धीरज बोलला , नाही नाही तस काही नाही , आम्ही या किल्ल्याचे संवर्धन करणारे आहोत. किल्ला वाचायला हवा , तो पुढच्या पिढीला पाहायला मिळावा या साठी आम्ही किल्यावर काम करतो.
तस तो माणूस एकदम अवाक झाला...
होय का गड्यांनो..?
आणि ते डोक्यावर कसलं मशीन हाय ??
कोंढाण्यासाठी आणि महाराजांच्या स्वराज्यासाठी रगत सांडायला मिळालं. त्या चकमकितच हा देह ठेवायला मिळाला मला.
तशी पोरांचे हात-पाय थरथरू लागले , कोणाच्याच तोंडातून शब्द फुटत नव्हता. अंगातील रक्त सळसळ करू लागला.
तस कसबस धाडस करून ओमकार बोलला ? मग आज तुम्ही इथे कस ?
मावळा :- या गडकोटकासाठी जीव द्यायला मिळाला होता हे माझं थोर नशीब. तशी या गडकोटाची आठवणं येत असते. तेव्हा हे गडकोट पाहण्यासाठी स्वर्गातून खाली येत असत्यो मी अधून मधून.
तो मावळा बोलला , गड्यांनो तुम्ही हे जी मोहीम उघडली हाय , त्याला माझा आणि आपल्या दोन्ही धन्यांचा आशीर्वाद हाय. आशा नेक कामात आपलं धनी आशीर्वाद रूपाने नेहमीच माग अस्त्यात.
थोरल महाराजसाहेब म्हणायचं की जोवर हा चंद्र -सूर्य असेल तोवर या पृथ्वीतलावर गडकिल्ले राहतील. हा महाराजसाहेबांचा शबुद तुम्हालाच खरा करायचा हाय गड्याने.
पोरांनी त्या रणवीर शूर मावळ्याचे चरण स्पर्श केले , मावळ्यांने आशीर्वाद दिले. तेवढ्यात अचानक तो मावळा अदृश्य झाला. पोरांना साक्षात शिवरायांच्या मावळ्याचा आशीर्वाद भेटला तस जोशाने पोर मोहिमेसाठी पुढं निघाली.
( कथा काल्पनिक जरूर आहे , पण आज किल्यावर आपण कशासाठी जातोय ? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा , जर इतिहासाची धडे घेयची असेल तरच किल्यावर येण्याचा तुमचा उद्देश सफल आहे. अन्यथा tp करायला किल्यावर येऊ पण नका )
~ फिरस्ती सुन्या..!!